भिवंडी(प्रतिनिधी):- भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता करांची वसुली करण्या बाबत व्याज दरात सुट देणारी अभय योजना राबवून देखील काही मालमत्ता धारक मालमत्ता कर थकबाकी भरणा करीत नसल्याने पालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या आदेशाने उपायुक्त वंदना गुळवे यांच्या नेतृत्वाखाली थकीत कर वसुली करण्याची जबाबदारी दिलेले सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल भालेराव यांनी शहरातील विविध भागात मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी प्रभाग समिती क्र. ४ अंतर्गत सोमानगर या भागात एका चार मजली इमारतीवर एकूण ७ लाख ४५ हजार रूपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याप्रकरणी येथील तब्बल १० नळ कनेक्शन तोडण्यात आले असून ६ विजेच्या मोटारी जप्त करण्याची कारवाई केली. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाच्या या धडक मोहीमेचा धसका एका थकीत कर धारकाने घेतल्याने सर थकीत कर धारकाने आपल्या वरील कारवाई टाळण्यासाठी तात्काळ घटनास्थळीच अधिकायांकडे २० हजार रूपयांचा भरणा केला. सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल भालेराव यांनी सुरूकेलेल्या या धडक वसुली मोहिमेनंतर थकीत मालमत्ता धारकांमध्ये खळबळ उडाली असून त्यामुळे येत्या काही दिवसांत मालमत्ता कराच्या वसुलीत निश्चितच वाढ होण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली असून थकीत कर वसुलीच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सोईसुविधा मिळणार असल्याचे संकेत व्यक्त करण्यात येत आहेत.
भिवंडीत मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेची धडक मोहीम १० नळ कनेक्शन तोडले तर ६ विजेच्या मोटारी जप्त