एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा शिक्षण विभाग वा-यावर, १४ मजूर पदापैकी १३ पद रिक्त

शहापूर(संजय भालेराव):- आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजकल्याण विभागाअंतर्गत आदिवासी विकास विभागातील एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय असून त्यांचे मार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांमार्फत सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण, शिक्षणामध्ये प्रगती, सामाजिक न्याय व महिला व बाल विकास, आरोग्य, पोषण, रोजगार इत्यादी योजना राबविण्यात येतात. परंतू प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर या कार्यालयातील शिक्षण विभागातील १४ मंजूर पदांपैकी १३ पद रिक्त असल्याने येथील शिक्षण विभाग वा-यावर असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. तर शासकिय वसतिगृहातील ५६ टक्के पदे रिक्तच असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे जिल्हयातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत एकूण तेवीस शासकिय आश्रमशाळा, बारा शासकिय वसतिगृह येत असून या आश्रमशाळेत ४ हजार ८७८ मुले, ४ हजार ८९९ मुली असे एकूण ९ हजार ७७७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर ७१४ विद्यार्थी हे शासकिय वसतिगृहात राहतात. यांच्यावर प्रकल्प अधिकारी समवेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शाळा व कार्यालय यावर नियंत्रण ठेवण्याचे हे काम करत असतात. परंतू शहापूर प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग या चार मंजर पदांपैकी फक्त एकच पद भरलेले असून सन २०१४ पासून तीन पदच रिक्तच आहेत. तसेच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शाळा व कार्यालय ही दहा पदे असून सन २०१४ पासून ८, २०१६ पासून २, व २०१८ पासून १ असे दहाच्या दहा पदे रिक्तच असल्याने २३ शासकिय आश्रमशाळा व विद्यार्थी यांचे शिक्षणाबाबत गंभीर बाब उघड झाली आहे तर शासकिय वसतिगृहातील ७१ मंजूर पदांपैकी केवळ ३१ पदे भरली आहेत व ४० पदे रिक्तच असल्याने येथील विद्यार्थी असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे प्रकल्प कार्यालयात एकूण ६६ मंजूर पदे असून त्यापैकी २२ पदे रिक्त आहेत. याबाबत शहापूर प्रकल्प अधिकारी तसेच शासन उदासिन असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच एकूण तेवीस आश्रमशाळांवर २० मंजूर मुख्याध्यापक पदे असताना केवळ १३ पदे भरलेली असून गेल्या अनेक वर्षापासून तब्बल सात शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकांवर आहे. त्यामुळे ही पदे देखील तात्काळ भरणे गरजेचे आहे. याबाबत शिक्षण विभागातील परिवेक्षीय पदे मोठया प्रमाणात रिक्त असून सदर पदे भरती करणे संदर्भीय वरील कार्यालयास पाठपुरावा सुरू असल्याची प्रतिक्रिया अरूणकुमार जाधवप्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर, जि. ठाणे यांनी दिली आहे. तर आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने रिक्त पदांच्या नेमणुका करण्याबाबत माझी आग्रहाची मागणी असल्याबाबत दौलत दरोडा आमदार शहापूर विधानसभा यांनी व्यक्त केले आहे.